Ticker

6/recent/ticker-posts

न्हावरे-शिक्रापूर महामार्गावर कार-कंटेनरचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : न्हावरे शिक्रापूर महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्हावरे-शिक्रापूर महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनर ट्रकचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या कारवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृतांमध्ये कैलास कृष्णाजी गायकवाड (वय 50), गौरी कैलास गायकवाड (वय 20), गणेश महादेव निरलेकर (वय 40) तर दुर्गा कैलास गायकवाड (वय 45) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

बापलेकीच्या मृत्यूने गावात हळहळ

मृतांमध्ये न्हावरे येथील बाप लेकीचा समावेश आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर कंटेनर चालक पळून गेला आहे. घटनेचा पुढील तपास न्हावरे पोलीस करत आहेत.