पुणे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २८४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या योगदानाला आदराने गौरवताना, रामोशी-बेडर समाजाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. माजी मंत्री दिवंगत गिरीश बापट, माजी आमदार दिवंगत बाबूराव पाचर्णे, दिवंगत रामभाऊ जाधव आणि दिवंगत सुनील चव्हाण यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे, बाबूराव जमादार, छगन जाधव आणि बाबूराव चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, राजे उमाजी नाईक हे खरे क्रांतिकारक होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमी काव्याचा वापर करून ब्रिटिशांना धडा शिकवला. रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजासाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली. रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ' च्या माध्यमातून २ लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज आणि उद्योजक व व्यावसायिक घडवण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, रामोशी-बेडर समाजातील तरुणांसाठी पोलीस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण व प्रशिक्षणासाठी महाज्योती आणि सारथी यांसारख्या योजना राबवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
Social Plugin