सासवड, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : पुरंदर तालुक्यातील नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थ चौकातील महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चानंतर तहसील कचेरी येथे या संदर्भातील निवेदन पुरंदरचे नायब तहसीलदार संदीप पाटील यांना दिले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली असून, त्यावर शासनाने विचार करून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे, तसे न झाल्यास विमानतळाला नाव देण्यासाठी राज्यभर तालुकास्तरावर मोर्चे आंदोलने काढले जातील, असे दौलत शितोळे यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव, सल्लागार समितीचे अध्यक्ष गणपत शितकल, राज्याचे प्रवक्ते गंगाराम जाधव, विष्णू भोसले, नाना ताथवडकर, सोलापूरचे अध्यक्ष सुनील जाधव, राज्याचे उपाध्यक्ष गणेश खाडे, साहेबराव जाधव, अनिल विखे, सुहास काशीद, गंगूबाई नाईक, कैलास धिवार यांनी विचार व्यक्त केले. यावेळी खंडू जाधव, यशवंत भांडवलकर, नीलेश जाधव, लालासाहेब भंडलकर, किसन महाराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.
Social Plugin