शिरूर, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरी गेलेला ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. निलेश प्रकाश कोरेकर (वय ४०) रा. न्हावरे ता. शिरूर यांनी १ मार्च २०२५ रोजी याबद्दल फिर्याद दिली होती.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर रित्या सुरू करण्यात आला होता. तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, चोरट्यांनी ट्रॅक्टर चोरी करून न्हावरा रोडने करडे, रांजणगाव, निमगाव म्हाळुंगी मार्गे पुन्हा न्हावरा - शिक्रापूर रोडला ट्रॅक्टर आल्याचे आढळून आले. पुढे सीसीटीव्हीचा अभाव असल्याने ट्रॅक्टरचा माग काढण्यास पथकाला अडचणी येवू लागल्या. तांत्रिक विश्लेषणाचा आधार गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवून सदरचा गुन्हा हा समीर बापू कुंजीर (रा. टाकळी भिमा ता. दौंड, जि पुणे) याने त्याच्या साथीदारासह केला असल्याची माहिती समजली.
त्यांच्याजवळ न्यू हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आहे, अशी बातमी तपास पथकाला मिळाली. त्याआधारे संशयिताचा शोध घेत असताना स्था.गु.शा.चे पथकाने (दि. १७) मार्च रोजी आरोपी समीर बापू कुंजीर (वय २१) आणि निखील दत्तात्रय ठाकर (वय २२) दोघे रा. टाकळी भिमा, ता. दौंड जि पुणे यांना बाबुराव नगर, शिरूर येथून ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. त्यांचेकडून गुन्ह्यात चोरी गेलेला न्यू हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व काकरी पाळीचे यंत्र असा एकूण २,००,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, सागर धुमाळ आणि सहायक पोलीस निरीक्षक सागर शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
Social Plugin