शिरुर, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : शहर आणि गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाच आहे. त्यासाठी प्रत्येक गावाने ग्राम सुरक्षा दल कार्यरत करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिले. शिरुर येथील प्रशासकिय इमारतीतील सभागृहात व्यापारी पोलीस पाटील आणि व्यवसायिक यांची बैठक शिरुर पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी मार्गदर्शन केले.
शहरातील व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन पोलीस मित्र व प्रत्येक गावचे पोलीस पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती पोलीस स्टेशन व पत्रकार यांना तातडीने पुरवणे गरजेचे आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो, असे आवाहन पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केलं.
शिरूर केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी बाबाजी गलांडे यांनी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेचे तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली तर वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात मदत होईल, असे मत मांडले. सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी संजय बारवकर यांनी विधायक सूचना मांडल्या. शहरातील जनता शांतता प्रिय असून हे एक व्यापारी शहर आहे. श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात शिरूर शहरात व्यापारासाठी येत असते. त्यामुळे जोशीवाडी ते पाबळ फाटा तसेच निर्माण प्लाझा या परिसरात मोठी वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चार चाकी गाड्यांचे पार्किंग मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे शहरातील नागरिकांना रस्त्याने चालणे मोठे अडचणीचे होत आहे. यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस पाटील व पत्रकार यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
Social Plugin