Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय मोडी लिपी परीक्षेत न्हावरे येथील आकांक्षा कांडगे प्रथम



 न्हावरे, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना कायम नवीन शिकण्याचा ध्यास असायला हवा. तुमच्यातील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही कोणत्याही विषयात पारंगत होऊ शकता. असाच एक पराक्रम वैद्यकीय शाखेत शिक्षण घेणाऱ्या आकांशा कांडगे या विद्यार्थीनीने केला आहे. राज्यस्तरीय मोडी लिपी परीक्षेत आकांक्षा कांडगे हिने पहिला क्रमांक मिळवला आहे.


साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय व पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मोडी लिपी परीक्षेत न्हावरे (ता. शिरूर) येथील आकांक्षा संभाजीराव कांडगे हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय येथे १० दिवस मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.


यामध्ये राज्यातून ८३ मोडी लिपी अभ्यासू सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मोडी लिपी परीक्षेत आकांक्षा कांडगे हिने प्रथम क्रमांक मिळविला. कार्यशाळा प्रशिक्षक म्हणून अपर्णा कुलकर्णी व कल्पना कोठावळे यांनी काम पाहिले. तर या स्पर्धेच्या आयोजनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग चौधरी व इतिहास विभागप्रमुख डॉ. पद्माकर गोरे यांनी परिश्रम घेतले. आकांक्षा सध्या वाय. एम. टी. आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, खारघर, नवी मुंबई येथे प्रथम वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.


आज सदर वर्गामध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींचा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सदर वर्गासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून ८३ परीक्षार्थींनी सहभाग घेऊन  प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल विद्यालयाने सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक, शिवव्याख्याते व मोडी लिपी तज्ञ मा. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा गोड समारोप झाला. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू ढमढेरे, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, इतिहास विभागप्रमुख डॉ. पद्माकर गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.