न्हावरे : परिस्थिती संघर्ष करायला शिकवते. कष्टाची भाजी भाकर नवनवीन अनुभव देते. अशाच शेतमजुर असलेल्या आई-बापाच्या कष्टाचे चीज करीत मुलाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या कुरुळी येथील जयराम सोमनाथ देशमुख या युवकाची ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीने मिरवणूक काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
जयराम देशमुख यांच्या वडिलांचं निधन झालं असून आई, बहीण आणि दाजीने केलेल्या मदतीने तो शिक्षण घेत होता. आपल्या काळ्या आईची सेवा करीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जयराम यांच्या आईने मुलाला शिकविले. जयराम हा पुणे येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता. यावेळी तोही हॉटेलमध्ये काम करुन आपला खर्च भागवत. तो गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम करत होता. त्याला अनेकदा अपयश आलं. मात्र, अपयशाने खचून न जाता त्याने आपले प्रयत्न चालू ठेवले. अखेर जयरामने पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईकांनी जयराम याची मिरवणूक काढत भव्य सत्काराचे आयोजन केले होते.
0 Comments