न्हावरे (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा संस्था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंतीही साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक बाबुरावजी घोलप, मामासाहेब मोहोळ आणि क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि संस्थेविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
यावेळी, क्रांतीवीर उमाजी नाईक हे केवळ एक नाव नाही, तर ते शौर्य, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या धैर्याचे प्रतीक आहेत. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामापूर्वीच त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले. त्यांच्या एका हाकेवर हजारो मावळे एकत्र आले आणि त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी कधीही इंग्रजांपुढे मान झुकवली नाही. त्यांच्या याच शौर्यामुळे त्यांना 'आद्य क्रांतिकारक' म्हणून ओळखले जाते.
आजच्या आधुनिक काळात, त्यांच्या कार्यापासून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर ते आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते, असा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. स्वाभिमानाने जगायला शिकवणारे त्यांचे कार्य आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, असे मनोगत विद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक रवींद्र पंडितमान, बाळासाहेब जाधव, प्रा. जालिंदर जाधव, प्रा. राजकुमार जगताप, चांगदेव होळमुंडे, डॉ. दत्तात्रय कराडे, धनंजय शितोळे, बाबुराव आसवले, तुषार गायकवाड, गोरक्ष भुजबळ, गणेश गायकवाड, अक्षय मदने तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Social Plugin