Ticker

6/recent/ticker-posts

दारूच्या वादातून मित्राचा खून; शिरूर पोलिसांची १२ तासांत परजिल्ह्यातून आरोपीला अटक!

शिरूर, (सुधीर खोमणे, प्रतिनिधी) : दारू पिण्याच्या वादातून एका मित्राचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्यात टाकून पळून गेलेल्या आरोपीला शिरूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या शिरूर पोलीस स्टेशनच्या या कामगिरीमुळे खळबळ उडालेल्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

दिनांक २७/०९/२०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता शिरूर गावच्या हद्दीतील पांजरपोळ येथील मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अशोक तात्या खंडागळे (वय ३१, रा. बोराडेमळा, शिरूर) यांचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्यूस पाण्यात बुडणे हे कारण नसून, शरीरावर मृत्यूपूर्व जखमा असल्याचे उघड झाले.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर असे निष्पन्न झाले की, अशोक खंडागळे यांना त्यांचे मित्र आकाश ज्ञानेश्वर लोहार (रा. शिरूर) आणि त्याचा एक साथीदार यांनी दारू पिण्यासाठी बोलावले होते. तेथे दारू पिण्याच्या वादातून आकाश लोहार आणि त्याच्या साथीदाराने अशोक खंडागळे यांची गळा दाबून निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्याच्या खड्ड्यात टाकून ते पळून गेले.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी आकाश ज्ञानेश्वर लोहार हा कौठाळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाली. शिरूर पोलिसांनी पंढरपूर येथे धाव घेऊन सापळा रचला आणि मुख्य आरोपी आकाश ज्ञानेश्वर लोहार (वय २५) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान दारूच्या भांडणातून खून केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता, दिनांक १४/१०/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.