Ticker

6/recent/ticker-posts

राजगड-तोरणा ट्रेकिंगला गेलेल्या ३० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला; ७ जखमी, पाच गंभीर

पुणे : ऐतिहासिक किल्ले राजगड आणि तोरणा दरम्यान ट्रेकिंगसाठी गेलेल्या सुमारे ३० पर्यटकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. यात एकूण ७ पर्यटक जखमी झाले असून त्यापैकी दत्तात्रय पवार, सुनील सोमवंशी, सतीश सिनारे, राहुल कुंभार, हर्षल निर्जे निर्जेकर, विशाल इंगळे आणि चेतन ढोले या पाच जणांची नावे समोर आली आहेत. जखमींना त्वरित उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी, 4 ऑक्टोबर रोजी ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांच्या या गटावर अचानकपणे मधमाश्यांच्या थव्याने हल्ला चढवला. मधमाश्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे ट्रेकर्समध्ये एकच गोंधळ उडाला आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. या घटनेत सात पर्यटक जखमी झाले.



जखमींमध्ये दत्तात्रय पवार, सुनील सोमवंशी, सतीश सिनारे, राहुल कुंभार आणि चेतन ढोले यांचा समावेश आहे. यातील काही पर्यटकांना मधमाश्यांनी जास्त डंख मारल्यामुळे त्यांची प्रकृती थोडी गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली आणि त्यांना सुरक्षितपणे खाली आणले.

डोंगर-किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाताना पर्यटकांनी सुगंधी द्रव्ये (परफ्युम) वापरणे टाळावे, तसेच मधमाश्यांच्या पोळ्यांपासून दूर राहावे, असे आवाहन वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून वारंवार केले जाते. या घटनेमुळे ट्रेकिंगला जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इतर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.