Ticker

6/recent/ticker-posts

गरजू महिलांना 'व्यवसायाची नवी दिशा': रांजणगाव गणपती येथे ITC आणि बंधन संस्थेचा उपक्रम


रांजणगाव गणपती (सुधीर खोमणे, प्रतिनिधी): रांजणगाव गणपती येथे काल आयटीसी मिशन सुनहरा कल (ITC Mission Sunhera Kal) आणि बंधन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निराधार, विधवा आणि परित्यक्ता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ITC मिशन सुनहरा कलच्या सायली कदम मॅडम यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "जोपर्यंत वय आहे, तोपर्यंत महिला दुसऱ्याच्या शेतात किंवा अन्यत्र काम करतात. पण वय झाल्यावर काय? म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या पायावर उभे करण्यासाठी आणि तुमचे पुढील आयुष्य सुखात जावे यासाठी व्यवसाय देत आहोत."

मॅडम पुढे म्हणाल्या की, महिलांनी या संस्थांवर विश्वास ठेवून, काम व्यवस्थित समजून घेतले, तर त्यांच्या कुटुंबाचे शिक्षण, भरपूर पैसा आणि मान-सन्मान मिळवण्यासारखी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. हाच एकमेव मार्ग आहे. त्यांनी महिलांना दिलेला व्यवसाय मन लावून करण्याची विनंती केली.

महिलांना विविध व्यवसायांसाठी मदत

या उपक्रमांतर्गत लाभार्थी महिलांना त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार विविध व्यवसायांसाठी वस्तू व साहित्य देण्यात आले. यात किराणा दुकान, चपलांचे दुकान, बांगड्यांचा व्यवसाय, कॉस्मेटिक वस्तू, भाजी-पाला गाडी, सुकट-बोंबील-मासे विक्री, पूजेचे सामान, शिलाई मशीन, पिको मशीन, कोंबड्या आणि कपड्यांचा व्यवसाय अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

यावेळी गट विकास अधिकारी श्री. महेश कमल आबासाहेब डोके (शिरूर), ITC च्या सायली कदम मॅडम, कारेगावच्या सरपंच सौ. हौसाबाई लालासाहेब जगताप, बंधन संस्थेचे एरिया कोऑर्डिनेटर श्री. संजीब बावरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गायकवाड यांनी केले, तर विशाल ओव्हाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा उपक्रम गरजू महिलांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी आणि स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी एक मोठी संधी देत आहे.